यापुढे हा ब्लॉग अपडेट करण्यात येणार नसला तरी श्री. छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील बातम्या, लेख आणि छायाचित्रांसाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील, याची कृपया नोंद घ्यावी.

Thursday, March 22, 2012

नागनाथअण्णा यांच्या निधनामुळे तळमळीचा समाजसेवक हरपला : छगन भुजबळ

मुंबई, दि. 22 मार्च : क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या निधनामुळे लढवय्या स्वातंत्र्यसैनिक आणि तळमळीचा समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, नागनाथअण्णांनी प्राणाची पर्वा न करता देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले. इंग्रजांच्या खजिन्याची लूट असो की रेल्वेची लूट अशा अनेक लढ्यांच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. म्हणूनच त्यांना 'क्रांतीवीर' अशी सार्थ उपाधी लोकांनी बहाल केली. स्वातंत्र्यानंतर सुद्धा शांत न राहता त्यांनी तितक्याच तळमळीने स्वतःला सामाजिक चळवळीला वाहून घेतले. ग्रामीण, आदिवासी आणि दीनदलितांच्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. शिक्षण आणि सहकार या दोन गोष्टींच्या सहाय्यानेच सर्वसामान्यांची प्रगती होणार आहे, हे पूर्णतः लक्षात घेऊनच त्यांनी या दोन क्षेत्रांच्या माध्यमातून लोकांच्या कल्याणासाठी कार्य सुरू ठेवले. त्याही क्षेत्रांत अत्यंत आदर्श असे कार्य त्यांनी उभे केले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका सच्चा सामाजिक नेत्याला मुकला आहे, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment