यापुढे हा ब्लॉग अपडेट करण्यात येणार नसला तरी श्री. छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील बातम्या, लेख आणि छायाचित्रांसाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील, याची कृपया नोंद घ्यावी.

Thursday, March 22, 2012

मुंबई-गोवा महामार्गाचे झाराप-पत्रादेवी टप्प्यातील काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण होणार

छगन भुजबळ यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई, दि. 22 मार्च : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17वरील झाराप ते पत्रादेवी या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम येत्या डिसेंबर 2012अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य राजन तेली यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या प्रस्तावाला उत्तरादाखल ते बोलत होते.

श्री. भुजबळ म्हणाले की, या महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील दुरुस्ती करण्यासाठी तो भाग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोंदा येथील पुलाच्या स्लॅबचे कामही या आठवड्यात सुरू करण्यात येणार असून दोन महिन्यांत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नातू-विन्हेरे हा पर्यायी मार्ग सुस्थितीत राहील, याची दक्षता घेण्यात येत आहे. वडखळ नाक्यावरील दुकानांची अतिक्रमणे हटविण्यात आली असून नवीन चौपदरीकरणाच्या कामात वडखळ नाक्याच्या बायपासनेच वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पळस्पे-इंदापूर टप्प्यातील खड्डेही मुजविण्यात आले असून पावसाळ्यात त्याचा त्रास होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांच्या वाढत्या प्रमाणाला रस्त्यांची दुर्दशा कारणीभूत नसून वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहने सुस्थितीत नसणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, मर्यादेपेक्षा अधिक भार वाहणे तसेच उंचसखल भागातील वळणावळणांचा रस्ता या बाबी कारणीभूत असल्याचे स्पष्ट करून श्री. भुजबळ यांनी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही सभागृहाला दिली. त्यानुसार, राज्य अपघात निवारण समितीने सुचविलेल्या तात्पुरत्या स्वरुपाच्या 216 सुधारणा करण्यात आल्या आहेत; तर 495 कायमस्वरुपी कामांपैकी 273 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सन 2011-12च्या वार्षिक आराखड्यामध्ये रस्ते सुरक्षेची 15.40 कोटी रुपयांची 14 कामे समाविष्ट करण्यात आली असून त्यांची अंदाजपत्रके केंद्र शासनाला सादर करण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

मुंबई-गोवा महामार्ग कशेडी घाट, भोस्ते घाट, परशुराम घाट, कामथे घाट, आरवली घाट, निवळी घाट, अंजनारी घाट, वाकेड घाट, राजापूर घाट, कोडे घाट, नडगिवे घाट, वागदे घाट, अकेरी घाट, इन्सुली घाट अशा घाटांतून जात असून अनेक ठिकाणी वळणे आहेत. सदर वळणांच्या ठिकाणी क्रॅश बॅरिअर, सूचनाफलक, थर्मोप्लास्टीक पेंटने मार्किंग, डेलिनेटर,संरक्षक कठडे बसविण्यात आले असून महामार्ग वाहतुकीसाठी जास्तीत जास्त सुरक्षित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, महामार्गावर अन्यत्र आवश्यक त्या ठिकाणी सूचनाफलक, रिफ्लेक्टर, हजार्ड-मार्कर, झेब्राक्रॉसिंग मार्किंगही करण्यात आल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आलेल्या रस्ते नूतनीकरणाच्या कामांचीही भुजबळ यांनी सभागृहाला माहिती दिली. ते म्हणाले, 13व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्यक्षेत्रातील 65 किलोमीटर आणि स्थानिक क्षेत्राकडील 62 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. रस्ते व पूल विशेष दुरुस्ती अंतर्गत राज्यक्षेत्रातील सुमारे 200 किलोमीटर तर स्थानिक क्षेत्रातील सुमारे 70 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. अशा प्रकारे राज्य क्षेत्रातील एकूण 265 किलोमीटर तर स्थानिक क्षेत्रातील सुमारे 132 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे पूर्ण करण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment