यापुढे हा ब्लॉग अपडेट करण्यात येणार नसला तरी श्री. छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील बातम्या, लेख आणि छायाचित्रांसाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील, याची कृपया नोंद घ्यावी.

Wednesday, March 14, 2012

सुरक्षा, सुविधा आणि सुधारीकरणाला प्राधान्य देणारा रेल्वे अर्थसंकल्प

छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत

मुंबई, दि. 14 मार्च : प्रवासी सुरक्षा, सुविधा आणि आधुनिक सुधारीकरणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी सन 2012-13साठीचा रेल्वे अर्थसंकल्प आज दुपारी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देताना त्यासाठी स्वतंत्र सुरक्षा प्राधिकरणाची स्थापना, आधुनिकीकरणासाठी 5.6 लाख कोटी रुपयांचा आराखडा आणि रेल्वे रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट कौन्सिलच्या स्थापनेची घोषणा, पायाभूत सुविधांसाठी 2.5 लाख कोटींची तरतूद, सिग्नल, ट्रॅक, पूल, दूरसंचार आणि स्टेशन या पाच सुविधांच्या विकासावर भर देतानाच त्यासाठी भारतीय रेल्वे स्थानक विकास प्राधिकरणाची स्थापना अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे. ई-तिकीटांच्या प्रिंटऐवजी आता केवळ एसएमएससुद्धा ग्राह्य धरणे त्याचबरोबर ग्रीन टॉयलेट्सचा वापर या माध्यमातून रेल्वेचे धोरण आधुनिकतेबरोबरच पर्यावरण सुसंगत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महसूलवृद्धी तसेच तोटा भरून काढण्यासाठी रेल्वे भाडेवाढीचे संकेत रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या मुंबई भेटीवेळी दिले होते. त्यानुसार त्यांनी भाडेवाढ केली असली तरी ती 2 ते 3 पैसे प्रति किलोमीटर अशी सर्वसामान्य प्रवाशाला परवडण्याजोगी दिसते आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रासाठी रेल्वे अर्थसंकल्पातील विविध घोषणांचे स्वागत करताना भुजबळ यांनी म्हटले आहे की, एमयुटीपी प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या घोषणेमुळे मुंबईतील दळणवळणाच्या सुविधा विकास कार्यक्रमाला मोठे बळ लाभणार आहे. पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचे डीसी टू एसी विद्युतीकरण पूर्ण करण्याच्या घोषणेमुळे प्रवास गतिमान होण्याबरोबरच विजेचीही बचत होणार आहे. पनवेल-विरार जोडण्याचा प्रस्ताव तसेच चर्चगेट-विरार आणि सीएसटी-कल्याण एलेव्हेटेड मार्गांच्या प्रस्तावावर अभ्यासाचे सूतोवाचही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुणे-मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉरचा प्रस्तावही मुंबई-पुणे अंतर आणखी कमी होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याखेरीज अमरावती-पुणे (मार्गे अकोला-पूर्णा-लातूर), शिर्डी-पंढरपूर (मार्गे कुर्डूवाडी) या नव्या रेल्वेगाड्यांचा प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. नियोजन आयोगाला दिलेल्या नव्या 84 प्रस्तावांमध्ये धुळे-अंमळनेर, मनमाड-इंदोर (मार्गे मालेगाव, धुळे) तसेच पुणे-नाशिक या मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी वर्षात हाती घेण्यात येणाऱ्या नव्या सर्वेक्षणात नांदेड-लातूर रोड, नाशिक-सिन्नर, मालेगाव-सटाणा-साकी-चिंचपाडा, प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ ते ठाणे, शिर्डी-शहापूर-घोटी आणि नाशिक-सूरत या मार्गांचा समावेश आहे. याचा महाराष्ट्राच्या विकासासाठी भविष्यात खूप मोठा लाभ होणार आहे, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment