यापुढे हा ब्लॉग अपडेट करण्यात येणार नसला तरी श्री. छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील बातम्या, लेख आणि छायाचित्रांसाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील, याची कृपया नोंद घ्यावी.

Thursday, December 22, 2011

विदर्भातील वन-पर्यटन विकासासाठी 'एमटीडीसी'कडून वन विकास महामंडळाला 4 कोटी 15 लाखांचा निधी

नागपूर, दि. 23 डिसेंबर : विदर्भातील वन-पर्यटन विकासाच्या संदर्भात महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडून (एफ.डी.सी.एम.) प्राप्त झालेल्या पाच प्रस्तावांच्या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एम.टी.डी.सी.) सुमारे 4 कोटी 15 लाख रुपयांचा निधी वन विकास महामंडळाकडे वर्ग केला आहे. या विभागातील उर्वरित घटकांच्या विकासासाठीचे प्रस्तावही त्यांनी 'एमटीडीसी'ला तातडीने सादर करावेत, असे निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

राज्यातील निसर्ग पर्यटनांतर्गत (ईको-टुरिझम) राज्यस्तरीय सुकाणू समितीची बैठक काल सायंकाळी श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संबंधित वन विभागातील विकास कामांचा आढावाही घेण्यात आला. या बैठकीत श्री. भुजबळ बोलत होते.

बैठकीला वन विभागाचे सचिव प्रवीण परदेशी, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) डॉ. एस.के. खेतरपाल, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस.के. सूद, एमटीडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर, वन विभागाचे सहसचिव विवेक खांडेकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि वन विकास महामंडळ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वन-पर्यटन विकासाचे प्रस्ताव वन विकास महामंडळाने तयार करुन एमटीडीसीला सादर केल्यानंतर संबंधित कामासाठी आवश्यक निधी एमटीडीसीकडून वितरित होणे अपेक्षित आहे. त्यानुसार संबंधित वन विभागात वन विकास महामंडळाने निसर्ग पर्यटनासाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करणे अपेक्षित आहे. त्यानुसार विदर्भ निसर्ग पर्यटन विकास प्रकल्पात चार उपमंडळांचा (सब-सर्किट) समावेश असून त्यात बेस कॅम्प तसेच निसर्ग पर्यटनाच्या बाबी विकसित करणे प्रस्तावित आहे.

यामध्ये पेंच-रामटेक-खिंडसी-नगरधन, नवेगाव-इटियाडोह-अंभोरा-नागझिरा, ताडोबा-चपराळा-भामरागड आणि चिखलदरा-मेळघाट-नरनाळा या मंडळांचा समावेश आहे. या मंडळांसाठी रामटेक-खिंडसी, नवेगाव बांध, नगरधन, साकोली, बोधलकसा, ताडोबा आणि चिखलदरा या ठिकाणी बेस कॅम्प निर्माण करण्यात येणार आहेत. त्यांची कामेही प्रगतीपथावर आहेत. या मंडळांतील निसर्ग पर्यटन विषयक 15 घटकांचा विकास वन विकास महामंडळामार्फत करावयाचा असून त्यापैकी 5 घटकांसाठीचे प्रस्ताव वन विकास महामंडळाकडून प्राप्त होताच एमटीडीसीकडून सुमारे 4 कोटी 15 लाख रुपयांचा निधी त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला. इतर घटकांचे प्रस्तावही टप्प्याटप्प्याने सादर करण्यात येतील, असे वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी श्री. भुजबळ यांना सांगितले.

प्राप्त प्रस्तावांमध्ये नागझिरा (ता. साकोली, जि. भंडारा), ताडोबा (ता. भद्रावती, जि. चंद्रपूर), चपराळा (ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर) आणि कोलखाज व सिमाडोह (ता. मेळघाट, जि. अमरावती) यांचा समावेश असून तेथील पर्यटन विकासासाठी अनुक्रमे 1 कोटी 9 लाख रुपये, 1 कोटी 33 लाख रुपये, 24 लाख 71 हजार रुपये आणि 1 कोटी 49 लाख 50 हजार रुपयांचा निधी वन विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात एमटीडीसीच्या वतीने देण्यात आली. उर्वरित 10 घटकांसाठीचे प्रस्ताव शक्य तितक्या लवकर सादर करण्याची सूचना श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.

या बैठकीत राज्यातील अन्य ठिकाणच्या निसर्ग पर्यटनाशी संबंधित घटकांचाही आढावा घेण्यात आला. दाजीपूर (जि. कोल्हापूर) पर्यटक निवासासाठी वन खात्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव पर्यटन महामंडळाकडून आला. त्यावेळी दाजीपूर येथे सद्यस्थितीत असलेल्या पर्यटक निवासाच्या दुरुस्तीला काहीच हरकत नसल्याचे सचिव परदेशी यांनी स्पष्ट केले.

अजिंठा व्ह्यू पॉईंट येथील पाण्याच्या पाइपलाइनसाठी वन खात्याकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला परवानगी देण्यात यावी, असाही प्रस्ताव ठेवण्यात आला. यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता तसेच काही मूलभूत दक्षता घेतल्यास त्यातही काही अडचण येणार नाही, असेही श्री. परदेशी यांनी सांगितले.

याखेरीज किल्ले मालिकेअंतर्गत सिंहगड येथे दुकान चौथरे तसेच प्रसाधनगृहे व उपाहारगृहे यांच्यासाठी जागा, एलिफंटा येथे दुकान चौथऱ्यांसाठी जागा, कास व आगाशिव येथे तारेचे कुंपण, पादचारी मार्ग आदींसाठी परवानगी असे नवीन प्रस्तावही एमटीडीसीकडून सादर करण्यात आले. त्यांच्याबाबतही वन विभागाची सकारात्मक भूमिका राहील, असेही वन विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

No comments:

Post a Comment