यापुढे हा ब्लॉग अपडेट करण्यात येणार नसला तरी श्री. छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील बातम्या, लेख आणि छायाचित्रांसाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील, याची कृपया नोंद घ्यावी.

Saturday, October 15, 2011

छगन भुजबळ यांचा वाढदिवस हजारो चाहत्यांच्या जल्लोषात साजरा

मुंबई, दि. 15 ऑक्टोबर : हजारो कार्यकर्ते, समर्थक आणि चाहत्यांच्या जल्लोषी उपस्थितीत आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस येथील 'रामटेक' निवासस्थानी साजरा झाला. श्री. भुजबळ यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त आज सकाळपासूनच त्यांचे अभिनंदन करण्यासाठी शुभेच्छुक नागरिकांची 'रामटेक'वर रीघ लागली होती. अनेक मान्यवरांनीही दूरध्वनीवरून तसेच लेखी संदेशांद्वारे श्री. भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आज सकाळी सौ. मीनाताई भुजबळ यांच्यासह सर्व कुटुंबियांनी श्री. भुजबळ यांचे औक्षण केले. त्यानंतर 'रामटेक'च्या मागील लॉनवर उभारलेल्या मंडपामध्ये श्री. भुजबळ चाहत्यांना शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहिले. त्यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. भुजबळ यांच्या नावाचा जयघोष केला. त्यानंतर आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व कार्यकर्ते रांगेने उभे राहिले. श्री. भुजबळ यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्रातील ठिकठिकाणांहून तसेच राज्याबाहेरील कार्यकर्ते आणि समर्थकांनी गर्दी केली होती. समाजातील विविध स्तरांतल्या मान्यवरांचाही श्री. भुजबळ यांची भेट घेऊन शुभेच्छा देणाऱ्यांत समावेश होता. शुभेच्छांचा हा सिलसिला सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होता. तरीही श्री. भुजबळ अजिबात न कंटाळता सर्वांच्या शुभेच्छांचा सुहास्य मुद्रेने स्वीकार करीत होते.

यावेळी श्री. भुजबळ यांच्या हस्ते अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील चरित्रपुस्तक तसेच काठयांचे वितरण करण्यात आले. सातपूर येथील महात्मा फुले बहुउद्देशीय मंडळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुग्णवाहिकांचेही यावेळी भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बाहेरगावी असल्याने प्रतिनिधीद्वारे पुष्पगुच्छ पाठवून भुजबळांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, गृहमंत्री आर.आर. पाटील, मंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, नवाब मलिक, प्रकाश बिनसाळे, किसन कथोरे, अनिल कदम, जयंत जाधव, मंदाताई म्हात्रे, शिशीर शिंदे, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील शेकडो मान्यवरांनी श्री. भुजबळ यांना शुभेच्छा दिल्या. याखेरीज केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, मंत्री सुनील तटकरे, भास्कर जाधव, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पवार, वसंत पुरके, धनंजय मुंडे, माजी आमदार शिवराम दळवी, निवृत्ती डावरे, भिवारे गुरूजी आदींनी भुजबळ यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या.

भुजबळांच्या चाहत्यांचा 'रामटेक'वर मेळावा

छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'रामटेक'वर त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेला कार्यकर्त्यांचा ओघ रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. मोटारी, गाडया, बस आदी वाहनांनी कार्यकर्ते ताफ्याताफ्यानं दाखल होतच होते. खान्देशासह कोकणातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपली वाहने गिरगाव चौपाटीजवळ लावली आणि तेथून ते ढोलताशांचा गजर करीत मिरवणुकीने रामटेकवर दाखल झाले. रामटेकच्या लॉनवर देखील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. विविध ठिकाणांहून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील पारंपरिक नृत्ये सादर करून आपला आनंद व्यक्त केला. तसेच अनेक जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचे जथ्थे भुजबळ साहेबांचे छायाचित्र असणाऱ्या वेगवेगळया रंगांतील टी-शर्टमुळे लक्ष वेधून घेत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने रामटेकसह मलबार हिल परिसराला जत्रेचेच स्वरुप आले होते. कित्येक उत्साही कार्यकर्त्यांनी भले मोठे केकही आणले आणि भुजबळ यांच्या हस्ते कापून उपस्थित कार्यकर्त्यांना वाटले. यावेळी भुजबळ यांची 'लाडू तुला'सुध्दा करण्यात आली.

No comments:

Post a Comment