यापुढे हा ब्लॉग अपडेट करण्यात येणार नसला तरी श्री. छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील बातम्या, लेख आणि छायाचित्रांसाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील, याची कृपया नोंद घ्यावी.

Monday, October 17, 2011

विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखान्याची कामगिरी सहकार क्षेत्रासाठी आदर्शवत : भुजबळ

कारखान्याच्या 62व्या ऊस गाळप हंगामाचा प्रारंभ

शिर्डी, दि. 17 ऑक्टोबर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याने सलग 61 गळित हंगाम यशस्वीपणे पार पाडले, ही बाब सहकार क्षेत्राच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज काढले.

राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 62व्या ऊस गळित हंगामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे-पाटील आणि श्रीरामपूरच्या दि मुळा-प्रवरा इलेक्ट्रीक को-ऑप. सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब म्हस्के पाटील उपस्थित होते.

सुमारे साडे बारा हजार सभासद, त्यांचे कुटुंबिय तसेच ऊस तोडणी कामगार आणि त्यांचेही कुटुंबिय अशा व्यापक प्रमाणावरील लोकांच्या जीवनाला आधार देणाऱ्या या कारखान्याची कामगिरी अन्य साखर कारखान्यांसाठी सुद्धा आदर्शवत अशी आहे, असे प्रशंसोद्गारही भुजबळ यांनी यावेळी काढले.

यावेळी भुजबळ यांच्या हस्ते अपघात विमा योजना व डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील ऊसतोडणी व शेतमजूर सुरक्षा विमा योजना याअंतर्गत वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.

श्री. विखे-पाटील यांनी यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात उसाचे विक्रमी उत्पादन झाले असून नोव्हेंबरअखेर साखरेच्या उत्पादनास सुरवात होईल, असे सांगितले. कर्मचाऱ्यांना त्यांनी दिवाळीनिमित्त १८ टक्के बोनसही जाहीर केला.

यावेळी कार्यकारी संचालक आर.डी. शितोळे, चेअरमन भास्करराव खर्डे-पाटील, घनश्याम शेलार, कुंडलिकराव जगताप, दीपक पाटील-शिरसाठ, राहाता पंचायत समितीचे सभापती सुभाष गाडेकर-पाटील, सभासद, कर्मचारी, शेतकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment