यापुढे हा ब्लॉग अपडेट करण्यात येणार नसला तरी श्री. छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील बातम्या, लेख आणि छायाचित्रांसाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील, याची कृपया नोंद घ्यावी.

Saturday, October 15, 2011

राज्यपाल आज आहे, उद्या नसेन; पण भुजबळांशी मैत्रीचे नाते कायम

राज्यपाल के. शंकरनारायणन् यांचे भावोद्गार

मुंबई, दि. 15 ऑक्टोबर : राज्यपाल म्हणून आज इथे आहे, उद्या नसेन; पण छगन भुजबळ यांच्याशी जोडलेले मैत्रीचे संबंध नेहमीच कायम राहतील, असे भावनिक उद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी आज येथे काढले.

सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या विधिमंडळातील संकलित भाषणांचा समावेश असलेल्या 'झुंज वादळाशी' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते आज सायंकाळी राजभवन येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. श्री. भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार जयंत जाधव यांनी 'झुंज वादळाशी' या पुस्तकाचे संकलन केले आहे.

राज्यपाल यावेळी म्हणाले की, मी महाराष्ट्रात येण्यापूर्वीपासून श्री. भुजबळ यांना ओळखतो. महाराष्ट्राचा असूनही महाराष्ट्राबाहेर सर्वाधिक ओळखला जाणारा हा नेता आहे. अत्यंत सभ्य, सद्गुणी आणि सदैव मैत्रीभाव जोपासणाऱ्या भुजबळ यांची संघर्षशीलताही कौतुकास्पद आहे. त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांनी पुण्यात घेतलेल्या समता मेळाव्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. त्याखेरीज अन्य राज्यांतही त्यांनी असे मेळावे घतलेले आहेत. त्यांच्या सभांना मिळणारा उदंड प्रतिसादच भुजबळ म्हणजे एक लोकनेते असल्याचे स्पष्ट करतो. त्यांनी उभारलेलं शैक्षणिक कार्यही आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. त्यांच्याशी माझे जिव्हाळयाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि भविष्यातही अबाधित राहतील, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राबाहेरील अमराठी वाचकांसाठी 'झुंज वादळाशी' या पुस्तकाचा इंग्रजीमध्ये अनुवाद करावा, अशी सूचनाही राज्यपालांनी यावेळी केली.

यावेळी राज्यपाल शंकरनारायणन् यांनी देशातील राजकीय सद्यस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, राजकारण करणे ही सध्या तारेवरची कसरत बनली आहे. राजकीय पक्ष नकोतच, असे काही लोक म्हणू लागले आहेत. पण पक्षांशिवाय लोकशाही कशी असू शकेल? लोकशाही व्यवस्था केवळ देशात नव्हे, तर जगात टिकून राहण्यासाठी पक्षांची आवश्यकता आहेच. याचा अर्थ टीका करणे चुकीचे आहे, असे नव्हे, तर विवेकशील टीका होणे गरजेचे आहे. एक-दोन व्यक्तींच्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण राजकीय व्यवस्थेला दोषी ठरवणे चुकीचे आहे. भ्रष्टाचार प्रशासनात आहे, उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही आहे. पण त्यासाठी केवळ राजकीय क्षेत्रावर दोषारोप करण्यापेक्षा सर्वांनी मिळून त्याचा प्रतिकार करण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे आपल्यासाठी सुखद धक्का आहे. लोकांना माझी भाषण ऐकायला, बऱ्याचदा पाहायलाही आवडतात, पण वाचायला आवडतात की नाही, याबद्दल माझ्याही मनात कुतूहल आहे. ते या पुस्तकाच्या माध्यमातून स्पष्ट होईल. आमदार जयंत जाधव यांचे त्यांनी या पुस्तकाबद्दल आभार मानले.

यावेळी आमदार जयंत जाधव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, छगन भुजबळ यांनी आयुष्यभर अखंडितपणे दिलेल्या झुंजीचे प्रतिबिंब 'झुंज वादळाशी' या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. त्यांची विधिमंडळातील भाषणे हा एक मोलाचा ठेवा असून तो जतन करण्याचा, पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.

यावेळी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नानासाहेब महाले, दिलीप खैरे, संजय चौपाने, विनायक खैरे, संजय चव्हाण, निवृत्ती अरिंगळे, किशोर कन्हेरे, उदय सांगळे आदी उपस्थित होते.

'झुंज वादळाशी' या पुस्तकाविषयी...

या पुस्तकामध्ये श्री. भुजबळ यांनी सन 1989 ते 2003 या कालावधीत विधिमंडळात केलेल्या एकूण 43 भाषणांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये तेलगी प्रकरण, मुंबई एमईटी जागेसंदर्भात विरोधकांच्या आरोपांचे खंडन, विरोधी पक्षनेता असताना निवासस्थानावरील हल्ला, किणी हत्या प्रकरण, बाळासाहेब ठाकरे यांची सुरक्षा आदी अनेक गाजलेल्या भाषणांचा यात समावेश आहे. पुस्तकाला ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांची प्रस्तावना लाभली आहे.

भुजबळ आणि राज्यपालांच्या एकमेकांना शुभेच्छा

15 ऑक्टोबर हा राज्यपाल के. शंकरनारायणन् यांचाही वाढदिवस आहे. त्यामुळे या दोघांनीही आज राजभवनवर भेटता क्षणी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिष्टचिंतन केले. आरोग्य आहे, तर सर्व काही आहे, असे म्हणत राज्यपालांनी भुजबळांना उत्तम आरोग्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment