यापुढे हा ब्लॉग अपडेट करण्यात येणार नसला तरी श्री. छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील बातम्या, लेख आणि छायाचित्रांसाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील, याची कृपया नोंद घ्यावी.

Tuesday, October 11, 2011

छगन भुजबळ उद्या करणार डेक्कन ओडिसीतून सैर!

मुंबई, दि. 11 ऑक्टोबर : महाराष्ट्राची शाही ट्रेन असलेल्या आणि नुकत्याच नूतनीकृत केलेल्या 'डेक्कन ओडिसी'मधून उद्या, बुधवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ नाशिकपर्यंत प्रवास करणार आहेत. श्री. भुजबळ यांच्याच संकल्पनेतून साकार झालेल्या या शाही ट्रेनमधून त्यांचा हा पहिलाच प्रवास आहे.

अंतर्बाह्य खुलविलेल्या नव्या सजावटीसह, नव्या रंगरुपात 'डेक्कन ओडिसी' उद्या पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. श्री. भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सायंकाळी 4.40 वाजता येथील छत्रपती शिवाजी टर्मिनसमधून 'डेक्कन ओडिसी' या मोसमातील आपल्या पहिल्या प्रवासाला सुरवात करणार आहे.

यापूर्वी सन 1999 ते 2004 या कालावधीत राज्याचे पर्यटन मंत्री असताना श्री. भुजबळ यांनीच 'डेक्कन ओडिसी'ची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. यंदा पर्यटन मंत्री झाल्यानंतर सुध्दा राज्याच्या पर्यटन क्षेत्राला जागतिक नकाशावर झळकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. '26/11'च्या दहशतवादी हल्ल्यानंतर परदेशी पर्यटकांनी रद्द केलेली बुकिंग आणि त्यानंतर वाढीव हॉलेज चार्ज यांचा 'डेक्कन ओडिसी'च्या फेऱ्यांवर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर डेक्कन ओडिसीचे पुनरुज्जीवन आणि त्या माध्यमातून परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याचे श्री. भुजबळ यांचे प्रयत्न आहेत. या प्रयत्नांचाच भाग म्हणून डेक्कन ओडिसीचे नूतनीकरण करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात ती मुंबई-दिल्ली-मुंबई या मार्गावर चार्टर्ड ट्रीप करणार आहे. पुढे महाराष्ट्रातही तिच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

जगातील मोजक्या शाही ट्रेनपैकी एक असलेल्या 'डेक्कन ओडिसी'चे रुप यंदा अंतर्बाह्य बदलण्यात आले आहे. बाहेरील रंगसंगती बदलण्याबरोबरच अंतर्गत सजावटीमध्येही आकर्षक बदल करण्यात आले आहेत. पर्यटकांचा या शाही ट्रेनमधील निवास आणि प्रवास आरामदायी व्हावा, या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत. या नूतनीकरणानंतर उद्या ही ट्रेन प्रथमच प्रवास करणार आहे.

सध्या 'डेक्कन ओडिसी' चार्टर्ड ट्रीप (पॅन इंडिया) करणार आहे. मुंबई ते दिल्ली असा आठवडयाचा प्रवास आणि पुन्हा परतीचा आठवडयाचा प्रवास ही ट्रेन करेल. मुंबई- जळगाव (अजिंठा)- उदयपूर- सवाई माधोपूर- जयपूर- आग्रा- दिल्ली असा हा प्रवास असेल. एकूण 80 पर्यटक क्षमतेच्या या ट्रेनमधून उद्या 62 देशी-परदेशी पर्यटक प्रवास करणार आहेत. यामध्ये भारतीयांसह यु.के., नेदरलँड, यु.एस.ए., ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड या देशांतील पर्यटकांचा समावेश आहे.

'डेक्कन ओडिसी'च्या मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई अशा चार्टर्ड ट्रीपचे एप्रिल 2012 पर्यंतचे नियोजन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने रेल्वे मंडळाच्या सहकार्याने निश्चित केले आहे. 'डेक्कन ओडिसी'च्या यापुढील ट्रीप मुंबई सीएसटीहून 26 ऑक्टोबर 2011, 9 नोव्हेंबर 2011, 23 नोव्हेंबर 2011, 21 डिसेंबर 2011, 18 जानेवारी 2012, 8 फेब्रुवारी 2012, 22 फेब्रुवारी 2012, 14 मार्च 2012 आणि 4 एप्रिल 2012 या दिवशी निघतील.

या चार्टर्ड ट्रीपखेरीज 'डेक्कन ओडिसी'च्या महाराष्ट्र दर्शनाच्याही चार ट्रीपचे नियोजन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 7 ते 14 डिसेंबर 2011, 4 ते 11 जानेवारी 2012, 11 ते 18 जानेवारी 2012 आणि 1 ते 8 फेब्रुवारी 2012 या कालावधीत या चार ट्रीप निघतील. मुंबई- सिंधुदुर्ग- गोवा- कोल्हापूर- औरंगाबाद- जळगाव (अजिंठा)- नाशिक- मुंबई असा प्रवासाचा मार्ग असेल.

उपरोक्त ट्रीपखेरीज मुंबई-शिर्डी-नाशिक-मुंबई अशा एक दिवसाच्या छोटया ट्रीपचाही प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने रेल्वे मंत्रालयाला पाठविला आहे. 14 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2011 (दररोज एक या प्रमाणे सहा टूर), 7 मार्च ते 12 मार्च 2012 (दररोज एक या प्रमाणे सहा टूर) आणि 28 मार्च ते 2 एप्रिल 2012 (दररोज एक या प्रमाणे सहा टूर) अशा ट्रीप प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment