यापुढे हा ब्लॉग अपडेट करण्यात येणार नसला तरी श्री. छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील बातम्या, लेख आणि छायाचित्रांसाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील, याची कृपया नोंद घ्यावी.

Monday, October 10, 2011

जगजीत सिंग यांच्या निधनामुळे `भारतीय गझल गायकीचा राजा' हरपला - छगन भुजबळ

मुंबई, दि. 10 ऑक्टोबर : प्रख्यात गझल गायक जगजीत सिंग यांच्या निधनामुळे 'भारतीय गझल गायकीचा राजा' काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, आपल्या धीरगंभीर आणि हृदयाला भिडणाऱ्या आवाजामध्ये जगजीत सिंग यांनी कित्येक अवीट गोडीच्या चिरस्मरणीय गझलांचा नजराणा भारतीय गझल चाहत्यांना पेश केला. 'वो कागज की कश्ती...', 'होठों से छू लो तुम...', 'तुम को देखा तो ये खयाल आया...', 'चिठ्ठी ना कोई संदेस...', 'होशवालों को खबर क्या...', 'कल चौदवी की रात थी...', 'शाम से ऑंख में नमीं सी है...' अशा काही गझलांचा उल्लेख वानगीदाखल करता येईल. 'अर्थ', 'साथ साथ' आणि 'प्रेमगीत' या चित्रपटांतील त्यांनीच स्वरसाज चढविलेल्या गझल आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. नूरजहाँ, मल्लिका पुखराज, बेगम अख्तर, तलत मेहमूद, मेहदी हसन आणि गुलाम अली अशा दिग्गज गझल गायकांच्या मांदियाळीत जगजीत सिंग यांनी आपल्या अभिनव गायकीने स्वतंत्र स्थान निर्माण केले. गझल आणि भावगीत यांच्या संगमातून भारतीय गझलला एक नवी ओळख मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. पत्नी चित्रा सिंग यांच्यासमवेत त्यांच्या गझल अल्बमना आजही मोठी मागणी आहे. भारतीय चित्रपट संगीताच्या परीघाबाहेरचे सर्वाधिक यशस्वी रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून या दांपत्याचा गौरव केला जातो. 'बियाँड टाइम्स', 'होप', 'फेस टू फेस', 'मरासीम', 'आईना', 'चिराग', 'कहकशाँ' असे साठहून अधिक गझल अल्बम सिंग यांच्या नावावर आहेत. जगजीत सिंग यांचं त्यांच्या चाहत्यांशी असलेलं नातं 'हाथ छुटे भी तो, रिश्ते नहीं टुटा करतें...' अशा प्रकारचं होतं. सिंग आज शरीर रुपानं हयात नसले तरी त्यांच्याशी माझ्यासारख्या चाहत्यांचं गझलच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नातं सदैव अबाधित राहणार आहे. गझल आणि भजनांच्या माध्यमातून भारतीय संगीत क्षेत्राला त्यांनी दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment