यापुढे हा ब्लॉग अपडेट करण्यात येणार नसला तरी श्री. छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील बातम्या, लेख आणि छायाचित्रांसाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील, याची कृपया नोंद घ्यावी.

Wednesday, October 12, 2011

नूतनीकृत 'डेक्कन ओडिसी'चे 62 पर्यटकांसह दिल्लीकडे प्रयाण

पर्यटनमंत्री भुजबळ यांनीही केला नाशिकपर्यंत प्रवास

मुंबई, दि. 12 ऑक्टोबर : अंतर्बाह्य नूतनीकरण करण्यात आलेल्या 'डेक्कन ओडिसी' या महाराष्ट्राच्या शाही ट्रेनने येथील छत्रपती शिवाजी टर्मिनसहून आज सायंकाळी ठीक 4.40 वाजता राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत 62 देशी-विदेशी पर्यटकांसह राजधानी दिल्लीकडे प्रयाण केले. श्री. भुजबळ यांनी या ट्रेनमधून नाशिकपर्यंत प्रवास केला.

सायंकाळी 4 वाजता श्री. भुजबळ यांचे सीएसटी येथे आगमन झाले. 18 क्रमांकाच्या फलाटावर नव्या आकर्षक रंगसंगतीसह उभ्या असलेल्या डेक्कन ओडिसीचे नवे रुप पाहून ते अत्यंत प्रभावित झाले. 21 डब्यांच्या या ट्रेनची भुजबळ यांनी आतूनही पाहणी केली. 'जगातल्या मोजक्या पाच शाही ट्रेनपैकी एक असलेली डेक्कन ओडिसी ही आता आपल्या देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वोत्कृष्ट अशी शाही ट्रेन ठरली आहे. तिची अंतर्गत सजावट सुद्धा तिच्या लौकिकाला साजेशी ठरली आहे', अशी भावना श्री. भुजबळ यांनी यावेळी डेक्कन ओडिसीमधील 'संवाद' या कॉन्फरन्स बोगीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली. सध्या मुंबई-दिल्ली-मुंबई अशी चार्टर्ड सेवा देण्यास डेक्कन ओडिसी सिद्ध झालेली असली तरी राज्यात तिच्या अधिकाधिक फेऱ्या घडवून परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राच्या पर्यटनाकडे आकर्षित करण्याचे आपले प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

एकूण 80 पर्यटक क्षमतेच्या या ट्रेनमधून आज 62 देशी-परदेशी पर्यटकही आठ दिवसांच्या प्रवासासाठी निघाले. यामध्ये भारतीयांसह यु.के., नेदरलँड, यु.एस.ए., ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड या देशांतील पर्यटकांचा समावेश आहे. या पर्यटकांनी सुद्धा डेक्कन ओडिसीची फिरून पाहणी केली. तिचे आकर्षक रुप पाहून त्यांनीही आश्चर्यमिश्रित कौतुकाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यावेळी श्री. भुजबळ यांच्यासमवेत खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील, सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, महाव्यवस्थापक विजय चव्हाण यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment