यापुढे हा ब्लॉग अपडेट करण्यात येणार नसला तरी श्री. छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील बातम्या, लेख आणि छायाचित्रांसाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील, याची कृपया नोंद घ्यावी.

Thursday, September 29, 2011

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा 11 मार्चपासून शतकोत्तर सुवर्णजयंती महोत्सव

महोत्सव संस्मरणीय करण्यासाठी नियोजनबद्धरित्या कामाला लागा: छगन भुजबळ यांची सूचना

मुंबई, दि. 29 सप्टेंबर : बडोदा संस्थानचे तत्कालीन दूरदर्शी व लोकप्रिय महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनकार्याचा लौकिक सर्वदूर नेण्याच्या दृष्टीने त्यांचा शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव साजरा करणे योग्यच आहे. हा महोत्सव सर्वार्थाने उत्तम व संस्मरणीय व्हावा, यासाठी एका मध्यवर्ती समितीची स्थापना करावी; तसेच, स्थानिक पातळीवर जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी विविध गटांची निर्मिती करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने रुपरेषा ठरविण्यासाठी छगन भुजबळ यांच्या येथील रामटेक निवासस्थानी काल सायंकाळी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. कल्याण येथील खान्देशना एल्गार या संस्थेने या कामी पुढाकार घेतला.

हा महोत्सव दि. 11 मार्च 2012 ते 11 मार्च 2013 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. मात्र, महोत्सवाच्या प्रारंभ काळात महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था आदी निवडणुका येऊ घातल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन महोत्सवाचे नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगून भुजबल म्हणाले की, त्या दृष्टीने आपल्याला कामाच्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्या लागतील. वेळापत्रक ठरवावे लागेल. सयाजीरावांच्या जीवनकार्याविषयी पुस्तिका तयार करण्याची जबाबदारी प्रा. हरि नरके यांच्यावर सोपवावी. तसेच, या महोत्सवाच्या निमित्ताने राज्य शासन, केंद्र सरकार आणि गुजरात सरकार यांच्याकडे करावयाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे गट स्थापन करावेत, अशी सूचनाही भुजबळ यांनी केली.

सयाजीराव गायकवाड यांचे पणतु सत्यजित गायकवाड यांनी भुजबळ यांच्या सूचनेला अनुमोदन देऊन त्वरित कामाला सुरवात करावी, असे सुचविले.

यावेळी खान्दशना एल्गारचे अध्यक्ष विजय चव्हाण यांनी सांगितले की, सयाजीराव गायकवाड यांचे नाशिक जिल्ह्यातील जन्मस्थान कवळाणे येथून महोत्सवाची सुरवात होईल. या कालावधीत सयाजीरावांच्या जीवनकार्यावर पुस्तिका, टपाल तिकीट, पाच रुपयांचे चलनी नाणे काढणे, महाराष्ट्र तसेच गुजरात विधानसभेत सयाजीराव गायकवाड यांचे तैलचित्र व पुतळा उभारणे, कवळाणेला पर्यटनाचा दर्जा देणे, राज्य शासनातर्फे चित्रपटाची निर्मिती, मनमाड रेल्वे स्थानक तसेच बँक ऑफ बडोदा यांना सयाजीराव गायकवाड यांचे नाव देणे, नाशिकमधील उड्डाणपुलास सयाजीरावांचे नाव देणे इत्यादी मागण्या करण्यात येणार आहेत.

यावेळी बैठकीस खासदार समीर भुजबळ, खासदार प्रताप सोनवणे, सर्वश्री आमदार हेमंत टकले, अरुण गुजराथी, अब्दुल सत्तार, दादा भुसे, पंकज भुजबळ, श्रीमती विद्या चव्हाण, शिवेंद्रराजे भोसले, कवळाणेचे सरपंच तसेच खान्देशना एल्गार संस्थेचे बापू हटकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment