यापुढे हा ब्लॉग अपडेट करण्यात येणार नसला तरी श्री. छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील बातम्या, लेख आणि छायाचित्रांसाठी हा ब्लॉग वाचकांसाठी उपलब्ध राहील, याची कृपया नोंद घ्यावी.





Wednesday, November 21, 2012

बाळासाहेब, शिवसेना आणि मी -छगन भुजबळ




मी महाविद्यालयात असताना, नेमकं सांगायचं झाल्यास माटुंगा, मुंबई येथील व्ही.जे.टी.आय. या संस्थेत शिकत असताना तिथल्या विद्यार्थी संघटनेचा मी सचिव होतो. बाळासाहेब ठाकरे त्यावेळी प्रसिद्घ अशा सा.मार्मिक मधून वाचा व थंड बसा हे सदर चालवायचे. त्यामध्ये मुंबईत असलेल्या दाक्षिणात्यांच्या कंपन्या व त्यामध्ये काम करणाया दक्षिण भारतीयांची नावे जाहीर करायचे हे सदर अनेक आठवडे चाललं. त्यानंतर त्यांनी वाचा आणि उठा अशी घोषणा केली. त्यानंतर एके दिवशी अचानक बाळासाहेब ठाकरे जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर झालं. विद्यार्थी मित्र म्हणाले, ही सभा नोकरीच्या संदर्भात आहे. आपण सभेला जाऊया. भविष्यात आपल्याला फायदाच होईल. बाळासाहेबांची ही सभा मोठया दणक्यात पार पडली. या सभेत त्यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी आपण काम करणार असल्याचं जाहीर केलं. सभेनंतर मी त्यांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला माझगांव शिवसेना शाखेचा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली. त्यावेळी वॉर्ड निहाय शाखा प्रमुख नव्हते. शिवसेनेतील एक ज्येष्ठ नेते दत्ता प्रधान यांनी शिवसेनेच्या शाखांची व्यवस्थित मांडणी केली.

बाळासाहेबांची नंतरची भाषणं म्हणजे लोकांना चेतवण्याचा अंगार आणि ताकद असलेली भाषणं होती. त्यांच्या भाषणानं मराठी तरूण पेटून उठू लागले. आपल्या हक्कासाठी जागरूक झाले. त्यावेळी मुंबईत दाक्षिणात्यांची उडूपी हॉटेल्‌स आणि मराठी शिवसैनिक यांच्यामध्ये फार मोठा संघर्ष झाला. मुंबईच्या कामगार क्षेत्रात विशेषतः गिरणगावात कम्युनिष्टांचं मोठं प्राबल्य होतं. कम्युनिष्टांबरोबर शिवसेनेचा तीव्र असा संघर्ष झाला. कम्युनिष्टांचा विरोध वाढत गेला आणि त्यांच्या विरोधात वातावरणही वाढत गेलं.

बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर प्रेम होतं. त्यांच्या समवेत मी २५ वर्षे काम केलं. आम्ही एकत्र कुटुंबासारखे राहिलो. एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी आम्हाला प्रेम दिलं. ते नाशिकला आले म्हणजे माझ्याच घरी उतरत असत. माझ्या घराबाहेरील आवारात बाग बगीच्या करण्यामध्ये त्यांना आनंद मिळत असे. कोणते फुलझाड किंवा वेल कुठल्या ठिकाणी लावावी, याचं त्यांनी त्यावेळी मार्गदर्शन केलं. आवारातील एका विहीरीला पाणी लागत नव्हतं. त्यावेळी त्यांनी विहीरीला आडवे बोअर घेण्याची सूचना केली, ती आम्ही मानली, विहीरीला पाणी लागलं. 

बाळासाहेबांना गुणवान माणसं जमविण्याचा छंद होता. त्यांनी चित्रपट सृष्टीसह अनेक क्षेत्रातील दिग्गज माणसं जोडली. सुपरस्टार अमिताभ बच्चनला बोफोर्स प्रकरणात मदत केली. संजय दत्तला देखील त्यांनी मदत केली. दादा कोंडके तर शिवसैनिकच झाले होते. चित्रपट सृष्टीतले असे अनेक दिग्गज लोक बाळासाहेबांच्या प्रेमात कायमचे पडले. शिवसेनेत बाळासाहेबांमुळेच मोठमोठया सभा गाजवणारे आणि तोफखाना समजले गेलेले अनेक लोक आले. वि.मा.दि. पटवर्धनांसारखा ज्येष्ठ विचारवंत शिवसेनेच्या थिंकटँक मध्ये होता. बाळासाहेब त्यांच्याशी नेहमी चर्चा करीत असत. पत्रकार ग.वा. बेहरे, सेनापती बापट यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांशी बाळासाहेबांची घनिष्ट मैत्री होती. बाळासाहेबांच्या बोलण्यात हजरजबाबीपणा होता. विनोदी कोटया करून समोरच्या जनतेला हसविण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. अनेकांच्या नकला आपल्या भाषणात ते सहजपणे करीत. परिणामाची चिंता न करता एखाद्या सामाजिक हिताच्या विषयावर ते परखडपणे, स्पष्टपणे बोलत असत, कठोर आघात करीत असत.पुढे मी शिवसेनेतर्फे नगरसेवक झालो. १९८५-८६ साली मुंबईचा महापौर झालो. बेळगांवकारवार महाराष्ट्राला मिळावं म्हणून मोठं आंदोलन झालं होतं. मोरारजी देसाईंनी त्यावेळी कडक भूमिका घेतली होती. मी या आंदोलनात उतरल्यामुळे मला पहिल्याच दिवशी अटक झाली व सुटकाही झाली. पण पुढे मुंबई पेटली, जाळपोळ सुरू झाली. लोक भयंकर चिडले होते. बाळासाहेब ठाकरेंना देखील अटक झाली. तीन महिने बाळासाहेब तुरूंगात होते. नंतर १९८७ साली बेळगांव प्रश्नी झालेल्या आंदलनात आमचे नेते शरद पवार साहेब, बाळासाहेब ठाकरे, एस.एम.जोशी. एन.डी.पाटील यांनी बेळगांवात सत्याग्रह करावयचं ठरविले. या सत्याग्रहात शिवसेनेचं दुसया फळीचं नेतृत्त्व छगन भुजबळ करतील, असं ठरलं. कर्नाटकात हे समजताच भुजबळांना बेळगावामध्ये पाय ठेऊ देणार नाही असे जाहीर झालं. मी पांडे नावाचा हिंदी पत्रकार बनून कुर्ता पायजमा आणि गळ्यात शबनम बॅग अडकवून बाळासाहेबांना भेटायला गेलो. मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे, अस त्यांना म्हणालो परंतू त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मला ओळखलं नाही. नंतर गोव्याला गेलो तिथून नारायण आठवले आणि तरूण भारतचे संपादक किरण ठाकूर माझ्याबरोबरहोते. प्रमोद नलावडे नावाच्या वेशभूषाकाराने मला शेख इकबाल बनवले. सुटाबुटात आणि हातात पाईप घेऊन शेख अब्दुल्ला हे नाव धारण करून लोखंडी पाईपचा कारखानदार या नात्याने बेळगांवात प्रवेश मिळवला. आणि तेथे गुजराती व्यापायाच्या घरात आश्रय घेतला. भुजबळ म्हणून मला त्यावेळी कोणीही ओळखले नाही. बेळगांवात मोठे आंदोलन झाले. अनेकांची डोकी फुटली. आंदोलन कर्त्यांना धारवाडच्या जेलमध्ये टाकण्यात आले. मी दीड महिना जेल मध्ये होतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या इतिहासात अविभाज्य स्थान असलेल्या या सीमा आंदोलनात मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली, ती केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. चांगले काम केल्यामुळे त्यांच माझ्यावरील प्रेम आणि विह्णास वाढला. माझ्या पत्नीचं ऑपरेशन झाल्यामुळे ती मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल होती. त्यावेळी बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नी मॉ साहेब दोघेही रुग्णालयात येऊन माझ्या पत्नीच्या उशाशी बसले होते, असं भुजबळांनी आपल्या मुलाखतीत कृतज्ञतेने नमूद केलं आहे. शिवसेनेचा महापौर आणि आमदार अशी दोन्ही पदं मी भूषविली. सुंदर मुंबई मराठी मुंबई ही घोषणा देऊन त्याची सुरूवात म्हणून हुतात्मा स्मारकाजवळ अवघ्या ३३ दिवसात उद्यान शिल्प उभारले. प्रविण काटवींनी त्यांचं डिझाइन केलं. त्याचा पाया देखील मजबूत असा आहे. २६ जानेवारी १९८६ रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे बॉम्बे चे मुंबई असं नामकरण करण्यात मी पुढाकार घेतला. या नामकरण समारंभास सर्व पक्षाचे नेते आणि विविध भाषिक उपस्थित होते. आणि सर्वांनी त्यावेळी आम्ही यापूढे बॉम्बेचा उल्लेख मुंबई असाच करणार असा निर्धार केला.
 यामुळे मुंबईवर मराठीचा ठसा उमटला. मराठीचा हा ठसा कायम उमटला जावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभार मराठी भाषेतून सुरू झाला. सुंदर मुंबईस्वच्छ मुंबई या घोषणेअंतर्गत मुंबईतील सर्व ट्राफीक आयलंड सुंदर आणि हिरवीगार करण्याचं काम १९८६ साली विविध कंपन्यांना त्यांचा लोगो वापरण्याच्या अनुमतीसह दिलं ही संकल्पना त्यावेळी मुंबईत नवीनच होती. या कामावर बरीच टीका झाली. परंतू ही संकल्पना राबविण्यासाठी मला बाळासाहेबांचं सहकार्य आणि प्रोत्साहन मिळालं. मी हाती घेतलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या बाबतीत त्यांनी मला वेळोवेळी धीर दिला.
बाळासाहेब ठाकरे हे ख्यातनाम व वाचकप्रिय व्यंगचित्रकार होते. त्यांच्या व्यंगचित्रातून हजारो शब्दांचे सामर्थ्य व्यक्त होत असे. अशी व्यंगचित्र काढण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. आता सुध्दा फटकारे या त्यांच्या व्यंगचित्र पुस्तकात बाळासाहेबांच्या स्वभावातील हा पैलू स्पष्टपणे दिसून येतो. शिवसेनेत असताना मी लढवय्या नेता म्हणून ओळखला जात होतो. अनेक आंदोलनात मलाच अग्रभागी पाठवीले जात असे. विधानसभेत शिवसेनेचा एकमेव आमदार म्हणून मी हिरीरीने आवाज उठवित होतो. शिवसेना वाढविण्यासाठी मी मोठे योगदान दिलं. पुढे मंडल आयोगाच्या प्रश्नावर माझे आणि शिवसेनेचे मतभेद झाल्यामुळे मी १८ आमदारांसह शिवसेना सोडली. शिवसेना ब गटाचा मी नेता झालो. पक्षांतरानंतर १९९५ मध्ये विधान सभेत विरोधी पक्ष नेता बनलो. माझ्यावर शिवसेनेकडून हल्ले झाले. २५ वर्षे शिवसेनेसाठी शिवसेनेत राहून लढलो.
१९९० साली बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात एक प्रकरण न्यायालयात दाखल केलं होतं. बरीच वर्षं हे प्रकरण प्रलंबित होतं. बाळासाहेबांची प्रकृती विचारात घेता त्यांना या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टात बोलवणे योग्य नव्हे, असं माझं मत झाल्यामुळे हे प्रकरण मी मागे घेतलं. त्यानंतर मी माझ्या कुटुंबीयांसह मातोश्री वर स्नेहभोजनासाठी गेलो. अतिशय आनंदी वातावरणात आमची भेट झाली. आमच्यामध्ये पूर्वी भांडणे झाली होती, याची पूसटशी जाणीव देखील यावेळी झालेल्या आमच्या संवादात बाळासाहेबांकडून दिसून आली नाही. आमच्यातील प्रेमाचे संबंध पुन्हा पूर्ववत झाले. वाढदिवसाला आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत असू. आमच्यामध्ये असलेला पूर्वीचा कडवटपणा नंतर नाहीसा झाला. ज्या ज्या वेळी मी बाळासाहेबांना भेटलो, त्या त्या प्रत्येक वेळी त्यांचे विचार त्यांचा
दृष्टीकोन वेगळा असल्याचं जाणवलं. तरी सुद्घा आमच्या स्नेह संबंधामध्ये दुरावा आला नाही.
शिवसेनेत असताना ती वाढविण्यासाठी ज्या ताकदीनं मी लढलो, शिवसेना सोडल्यानंतर तेवढयाच ताकदीनं शिवसेनेच्या विरोधात लढलो. शिवसेनेत २० वर्षे मराठी भाषा आणि मराठी जनतेसाठी कार्य करीत होतो. तरीसुद्घा शिवसेना विधान सभेत जाऊ शकली नाही. ठाणे तसेच मुंबई महापालिकेत शिवसेना जिंकली होती. मात्र, विधान सभेत जाण्यासाठी हिंदुत्वाचे कार्ड शिवसेनेला वापरावे लागले. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे दुर्गा पूजनानंतर झालेल्या आंदोलनात मी वेषांतर करुन गेलो होतो. 

या
विषयावर नागपुरच्या विधानसभा अधिवेशनात चर्चाही झाली होती. काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांकाच्या बाजूने बोलत होता. हिंदुत्वासाठी मी कडक शब्दात आणि घणाघाती बोललो होतो. भाषण करताना काहीही बोलण्या ऐवजी विधान सभेत हाताच्या बोटाची मी विशिष्ट खूण केली होती. त्यावर मोठा गहबज झाला होता. मार्शलकरवी मला सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलं होतं. १५ दिवस मी बाहेर होतो. विधानसभेत मी जे काही केलं,त्याची माहिती देण्यासाठी भीतभीतच बाळासाहेबांना भेटलो. कदाचीत ते रागवतील, अशी मला भिती वाटत होती. मात्र, बाळासाहेबांनी मला या प्रकरणी शाबासकीच दिली. शिवसेनेने घेतलेल्या हिंदुत्वाच्या कार्डावर निवडून आलेला शिवसेनेचा पहिला आमदार म्हणजे डॉ.रमेश प्रभू होय. टी.बाळू आणि लखोबा याबाबत बोलताना भुजबळांनी आपली आठवण सांगितली. ते म्हणाले, मी विरोधी पक्ष नेता होतो. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेनाभाजपचं सरकार होतं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास एक वर्ष कुठल्याही वृत्त पत्रात किंवा प्रसिद्घी माध्यमात सेनाभाजपाच्या विरोधात एक अवाक्षरही छापलं गेलं नाही. याच काळात मी विरोधी पक्ष
नेता होतो. टीका करणं हे माझं काम होतं. याच काळात घाटकोपर येथे एक सभा झाली. तत्पूर्वी मी शिवसेना सोडल्यामु
ळे मला लखोबा हे नाव देऊन माझ्यावर टीका केली जात असे. याच घाटकोपरच्या सभेत मी माझ्या घणाघाती भाषणात बाळासाहेबांचा उल्लेख टी.बाळू असा केला.

नंतरच्या काळात किणी प्रकरण, मनोहर जोशी प्रकरण इत्यादी प्रकरणे बाहेर आली, वर्तमानपत्रात टीका सुरू झाली.शिवसेना सोडल्यानंतर माझ्यावर शिवसैनिकांनी मंत्रालय समोरच्या बंगल्यात मी राहत असताना मोठा हल्ला केला. बंगल्याच्या पुढून आणि पाठीमागून शिवसैनिक मला मारण्यासाठी बंगल्यात घुसले. त्यांनी बंगल्याचं वातानुकुलीत यंत्र फोडलं, दरवाजे फोडले, मी बंगल्याच्या शयन कक्षात होतो. माझ्या रक्षणासाठी एक पोलीस गार्ड आणि एक नवीन पोलीस तैनात होता. माझ्यावर आलेला बाका प्रसंग पाहून माझा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर माझ्या मदतीसाठी धावून आले होते. परंतू मी त्यांना येऊ नका म्हणून सांगितलं. माझ्या समवेत असलेल्या पोलिसाला काय सुबुद्घी सुचली कोणास ठाऊक? समोर हल्लेखोर दिसताच त्यानं हातातील बंदूक ताणून धरली आणि स्वतःच फायर फायर म्हणून जमावाच्या दिशेनं धावत गेला. त्याच्या या कृत्यामुळे आता गोळीबार होणार म्हणून माझ्यावर हल्ला करण्यासाठी आलेला जमाव पांगला गेला. अन्यथा त्यावेळी माझी काही खैर नव्हती. ४५ वर्षांपूर्वी शिवसेनेची निर्मिती करुन बाळासाहेबांनी शिवसेनेचा झेंडा मंत्रालयात फडकविण्याचं महाराष्ट्राला स्वप्न दिलं. आणि प्रयत्नपूर्वक त्यांनी ते साकार देखील केलं. एवढचं नव्हे तर लोकसभा आणि राज्यसभेत देखील त्यांनी शिवसेनेचे खासदार पाठविले. काही जणांना केंद्र सरकारमध्ये मंत्री सुद्घा केलं. बाळासाहेबांनी जे जे कार्य केलं, ते जागतिक दर्जाचं होतं. जाहीर सभेत बोलताना ते कधीच घाबरत नसत. तडजोड हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता. त्यांच सडेतोड बोलणं लोकांना भावायचं
म्हणूनच बाळासाहेबांच्या शब्दाखातर लोक प्राण देण्यास तयार असत.

(छगन भुजबळ यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींचा संपादित भाग.)

Tuesday, August 21, 2012

अजातशत्रू विलासराव : छगन भुजबळ

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विलासरावांबरोबर दीर्घकाळ काम करत असताना त्यांची कार्यशैली, व्यक्तिमत्त्व जवळून पाहता आले, अनुभवताही आले. त्यांच्याबरोबर कधीही संघर्षाचा किंवा कटुतेचा प्रसंग उद्‌भवल्याचे स्मरत नाही... सांगताहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ. 

विलासराव देशमुख यांचा बाभूळगावच्या सरपंचपदापासून महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा आणि सध्या केंद्रात मंत्री होण्यापर्यंतचा प्रवास मला नेहमीच स्तिमित करणारा ठरला आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आपलेपणाची भावना आहे. माझा त्यांचा संपर्क आला तो 1992 मध्ये मी शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मंत्रिमंडळात महसूलमंत्री झालो तेव्हा. त्यांच्या दिलखुलास स्वभावाची मला तेव्हाच जाणीव झाली. लगेच 1993 मध्ये शरद पवारसाहेब मुख्यमंत्री झाले आणि माझ्याकडे गृहनिर्माण खाते आले व पूर्वी माझ्याकडे असलेले महसूल खाते विलासरावांकडे देण्यात आले. महत्त्वाचे समजले जाणारे हे खाते हातून गेल्यामुळे मी नाराज झालो असेन असा विचार करून विलासराव आपणहून मला म्हणाले, "भुजबळसाहेब, "सीएम'ने हे खाते मला दिले आहे, पण तुमचे आणि माझे संबंध मित्रत्वाचेच राहतील. आपण कधीही गैरसमज करून घेऊ नका.'' 
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकार 1999 मध्ये सत्तेवर आले. त्या वेळी विलासराव पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री झालो. वस्तुतः ही निवडणूक आम्ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अशी अतिशय निकराने एकमेकांविरुद्ध लढलो होतो. त्यामुळे दोन्ही पक्षांत कटुता निर्माण झालेली होती. मात्र सरकार चालवताना विलासरावांनी ही कटुता कुठेही जाणवू दिली नाही; किंबहुना आघाडीचे सरकार चालवत असताना त्यांनी कुशलतेने नेतृत्व केले. आमचे दोघांचे आपापसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून कधीही वाद झाले नाहीत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर दीर्घकाळ काम करताना त्यांची कार्यशैली, व्यक्तिमत्त्व मला जवळून पाहता आले, अनुभवताही आले. कधीही त्यांच्यासोबत संघर्षाचा किंवा कटुतेचा प्रसंग उद्‌भवल्याचे स्मरत नाही. आघाडीच्या राजकारणाचा धर्म कसा सांभाळावा, याचे विलासराव हे एक उत्तम उदाहरण होय. त्यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून काम करत असताना, जेव्हा कठीण प्रसंग उद्‌भवले तेव्हा ते माझ्यामागे भक्कमपणे उभे राहिले. भरत शहा या हिरे व्यापाऱ्याला अटक केली तेव्हा त्यांनी माझी पाठराखणच केली. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याच्या फाईलवर मी जेव्हा गृहमंत्री म्हणून सही केली, तो प्रसंग मुख्यमंत्री विलासरावांना दूरचित्रवाहिन्यांवरून समजला. मात्र तो समजल्यानंतरसुद्धा गृहमंत्री म्हणून त्यांनी माझी पूर्ण पाठराखण केली. 
सरकारवर 2003 मध्ये अविश्‍वास ठरावाचा आणीबाणीचा प्रसंग निर्माण झाला होता. सरकारला पाठिंबा देणारे काही आमदार शिवसेनेकडून पळविण्यात आले. त्या वेळी मी आणि विलासरावांनी सतत संपर्कात राहून ज्या प्रकारे यंत्रणा राबवली आणि सरकार वाचविले, त्या प्रसंगात विलासरावांनी माझे कौतुकच केले. माझा पुतण्या समीर याला 2009 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी द्यावी, ही कल्पना विलासरावांची होती. पवारसाहेबांनी समीरला उमेदवारी दिल्यानंतर विलासराव स्वतः नाशिकला आले आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांना सांगून त्यांनी कॉंग्रेसची पूर्ण ताकद समीरच्या मागे उभी केली. 
राजकारणातील त्यांच्या या वैशिष्ट्यांशिवाय त्यांचे वैयक्तिक गुणही मला जेव्हा अनुभवायला मिळाले, तेव्हा मी त्यांचा जास्त चाहता झालो. आम्ही दोघे एका मानाने औरंगाबादला निघालो होतो. विमानाचा पंखा अचानक पेटला, तेव्हा विलासरावांना डुलकी लागलेली होती. मी त्यांना हलवून जागे केले आणि आगीकडे त्यांचे लक्ष वेधले, तेव्हा अजिबात गडबडून न जाता, "ठीक आहे, पायलटवर विश्‍वास ठेवा,' असा सल्ला त्यांनी आम्हाला शांतपणे दिला. त्या प्रसंगातून त्यांच्यातील हा धीरोदात्तपणा मी अनुभवला. एक अत्यंत उमद्या मनाचा आणि अजातशत्रू नेता, असे मी त्यांचे एका वाक्‍यात वर्णन करेन. विलासरावांच्या चेहऱ्यावर विलसणारे विशिष्ट स्मित हे केवळ त्यांचाच ट्रेडमार्क आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 
मैदानी वक्ता असलेल्या विलासरावांची बोलण्याची लकब, हजरजबाबीपणा आणि भाषणाच्या मधे-मधे प्रासंगिक विनोदांची पेरणी करणे, कोपरखळ्या मारणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आपल्या खुसखुशीत वक्तव्याने श्रोत्यांना खिळवून ठेवण्यात विलासराव नेहमी यशस्वी होत. राजकारणात असूनही कला, क्रीडा, संगीत, साहित्य या विषयांचे ते चाहते होते. चित्रपटाचे ते शौकीन आणि जाणकार होतेच. संगीत ऐकतानाही ते रसिकतेने त्याचा आस्वाद घेत असत. चित्रपट आणि कलाक्षेत्रातील कुणी भेटले, की त्यांच्याशी ते दिलखुलास गप्पा मारत असत. 
कित्येकदा सततच्या बैठकांमुळे आलेला शारिरिक तणाव हलका करण्यासाठी विलासराव बसल्या खुर्चीवरच मान इकडे तिकडे फिरवून थोडे रिलॅक्‍स होण्याचा प्रयत्न करीत असत. बैठकीतली ती त्यांची विशिष्ट स्टाईल! मात्र त्यामुळे व्हायचे असे, की आपले म्हणणे मांडणाऱ्या व्यक्तीला वाटायचे, की साहेबांचे आपल्या बोलण्याकडे लक्षच नाही. पण त्याच वेळी ते बोलणाऱ्या माणसाला अचानक एखादा वर्मावर ठेवणारा आणि बैठकीची दिशा ठरविणारा नेमका प्रश्‍न विलासरावांकडून विचारला जायचा. त्याला माहिती असेल तर ठीक, नाही तर त्याची आणि अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडालीच म्हणून समजायचे. सांगायचा मुद्दा असा, की प्रत्येक विषयाचे महत्त्व, गांभीर्य आणि त्यातल्या नेमक्‍या खाचाखोचा यांची अपडेट माहिती ठेवणारा असा हा नेता होता. 
विलासरावांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतले त्यांचे महत्त्वाचे योगदान कोणते असेल, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचे अत्यंत आक्रमकपणे मार्केटिंग केले. त्यासाठी त्यांनी अमेरिकेचा दोन वेळा, तर युरोपचा एक दौरा केला. राज्याचे नवीन औद्योगिक व गुंतवणूकविषयक धोरण आणि गृहनिर्माण धोरण जाहीर करून त्यांनी या दोन महत्त्वपूर्ण क्षेत्रांच्या विकासाला, विस्ताराला राज्यात चालना दिली. अनेक परदेशी उद्योगसमूहांना गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले. थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ महाराष्ट्राकडे सुरू झाला. बोईंग, जनरल मोटर्स अशा अनेक परदेशी कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली, आपले प्रकल्प स्थापन केले. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून मुंबईचा लौकिक जगभरात पसरविण्यामध्ये विलासराव यशस्वी झाले. दाव्होस इथे होणाऱ्या "वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये केवळ राष्ट्राध्यक्षांना निमंत्रित केले जाते. त्या परिषदेत सहभागी होण्याची संधी प्राप्त होणारे विलासराव हे पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री होते, ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. बिल गेट्‌स यांनीही त्यांना मायक्रोसॉफ्ट मुख्यालयास भेट देण्यासाठी निमंत्रित केले. महाराष्ट्रात काही महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्याची इच्छाही गेट्‌स यांनी व्यक्त केली. गेल्या पाच-दहा वर्षांत महाराष्ट्राची जी औद्योगिक प्रगती झाली, त्याचे श्रेय निःसंशयपणे विलासरावांचे आहे.
--
दि. 18 ऑगस्ट 2012च्या 'साप्ताहिक सकाळ'वरून साभार.  (http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20120818/4963576225468446966.htm

Monday, July 23, 2012

कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या निधनामुळे स्वातंत्र्यसंग्रामातील झुंजार व्यक्तिमत्त्व हरपले -छगन भुजबळ

मुंबई, दि. 23 जुलै : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या निधनामुळे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक झुंजार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटच्या प्रमुख म्हणून कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धात प्रवेश केला. ब्रह्मदेशामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही त्या सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिल्या. डाव्या विचारसरणीचा अंगिकार त्यांनी केला. बांगलादेशमध्ये निर्वासितांसाठी शिबिरे चालविण्याबरोबरच भोपाळ वायू दुर्घटना, 1984मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगली अशा अनेक प्रसंगी त्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीला त्वरेने दाखल झाल्या. त्यांच्यासाठी वैद्यकीय शिबिरे चालविण्याबरोबरच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभे करण्याच्या कामीही त्या सदैव अग्रेसर असत. स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजाच्या कल्याणासाठी हयात वेचणारे लढाऊ व्यक्तिमत्व कॅप्टन सहगल यांच्या रुपाने हरपले आहे, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

Friday, July 20, 2012

भुजबळांच्या ‘फायटिंग स्पिरीट’ची पुन्हा एकदा प्रचिती


अवघ्या तीन दिवसांत मंत्रालय पूर्वपदावर!
दि. 21 जून 2012 रोजी लागलेल्या आगीमुळे मंत्रालयाचे काळवंडलेले रुप.

अग्नीप्रलयानंतर अवघ्या तीन दिवसांत पूर्ववत करण्यात आलेली मंत्रालयाची इमारत.
मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालय पूर्वस्थितीत आणण्यासाठी विभागामार्फत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची आणि विविध कामांची पाहणी दरम्यान माहिती दिली.

(दि. 21 जून 2012 रोजी महाराष्ट्राचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाला अभूतपूर्व आग लागली. या आपत्तीच्या प्रसंगी न डगमगता सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालय पूर्वस्थितीत आणण्यासाठी केलेली प्रयत्नांची शर्थ आणि त्यांची धावपळ अगदी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासन कशा प्रकारे काम करू शकते आणि करते, याचे प्रत्यंतर या काळात आले. सदर लेख दि. 26 जून 2012 रोजी मी लिहिला होता. हा लेख विविध दैनिकांसह 'महान्यूज' या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वेब-पोर्टलवरही प्रकाशित झाला. पण त्या काळात काही तांत्रिक अडचणींमुळे या ब्लॉगवर तो प्रकाशित करता आला नाही. उद्या (दि. 21 जुलै 2012) मंत्रालयावर ओढवलेल्या या अग्नीप्रलयाला एक महिना पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने हा लेख येथे प्रकाशित करत आहे.)
 
गेल्या दि. 21 जून 2012 रोजी महाराष्ट्राचे मुख्यालय असलेल्या ‘मंत्रालया’स एका अतिशय अभूतपूर्व अशा आपत्तीला तोंड द्यावे लागले. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर लागलेली आग पसरून सातव्या मजल्यापर्यंतचा इमारतीचा सुमारे 25 ते 27 टक्के भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अचानक उद्भवलेल्या या आपत्तीमुळे मंत्रालयाशी संबंधित व्यक्तीच नव्हे, तर राज्यातली जनताही हतबुद्ध झाली. आता यातून सावरायला किती काळ लागेल, असा प्रश्न प्रत्येकालाच सतावू लागला. पण या आपत्तीनंतर झालेल्या मुख्यमंत्री महोदयांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दि. 25 जूनपर्यंत म्हणजे आपत्तीनंतरच्या केवळ तीन दिवसांत मंत्रालयाचे कामकाज पूर्वपदावर आणण्याचा निर्धार सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीरपणे व्यक्त केला आणि त्यांनी आपला निर्धार खरा करून दाखविल्यानं भुजबळांच्या ‘फायटिंग स्पिरीट’ची सर्वांनाच प्रचिती आली. मा. मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री, अन्य वरिष्ठ मंत्री, आयएएस अधिकारी यांच्यासह सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या संघर्षशील वृत्तीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
झालेली दुर्घटना ही दुर्दैवी होती; परंतु, त्यातून लवकरात लवकर सावरून राज्यातील जनतेला तसेच जगाला एक सकारात्मक संदेश देणं, ही तातडीची गरज होती. त्या दृष्टीनं छगन भुजबळ यांच्या घोषणेमुळं सर्वांनाच आव्हान पेलण्याचं बळ लाभलं.
मंत्रालय तीन दिवसांत पूर्ववत करण्याचं आव्हान जबरदस्त आहे, याची जाणीव खुद्द भुजबळांनाही होती. त्यामुळं त्यांनी त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उभारण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. 4 मुख्य अभियंते, 8 अधीक्षक अभियंते, 10 कार्यकारी अभियंते, 40 उपअभियंते आणि 125 कनिष्ठ अभियंते अशी अभियंत्यांची फौजच त्यांनी त्यासाठी तैनात ठेवली. त्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे हजारभर कामगार शुक्रवारी सायंकाळपासून मंत्रालय पूर्ववत करण्यासाठी तसंच चौथ्या ते सातव्या मजल्यावरील राख, जळालेल्या वस्तू यांचे ढिगारे उपसण्यासाठी रात्रंदिवस अखंडितपणे कार्यरत ठेवण्यात आले.
स्वतः श्री. भुजबळ यांनी संपूर्ण मंत्रालयात सुरू असलेल्या कामाची सातव्या मजल्यापासून ते तळमजल्यापर्यंत कानाकोपऱ्यात जाऊन पाहणी केली. संपूर्ण मंत्रालयामध्ये त्यांनी दररोज किमान तीन फेऱ्या मारल्या, त्या सुद्धा पायऱ्यांवरुन चढउतार करत आणि संपूर्ण मजले फिरत. सर्व संबंधितांना जागच्या जागी आवश्यक त्या सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत कामामध्ये खंड पडू देता कामा नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रत्येक अभियंता आणि कर्मचाऱ्यांना देऊन ठेवल्या.
शनिवारी (दि.23 जून) सकाळपासूनच भुजबळ मंत्रालयीन विभागांना पर्यायी जागेच्या पाहणीसाठी बाहेर पडले. जी.टी. हॉस्पिटलमध्ये लिफ्ट बंद असल्यानं सात-आठ मजले चढून जाऊन त्यांनी प्रत्येक मजल्याची पाहणी केली. त्याचप्रमाणे कूपरेज मैदानासमोरील एमटीएनएलच्या इमारतीमध्ये जाऊन तिथल्याही विविध मजल्यांची पाहणी केली. वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि बांधकाम भवनामध्येही जाऊन पाहणी केली. प्रचंड पायपीट केली, जिन्यांवरुन चढउतार केली. त्या सर्व इमारतींमध्ये किती जागा उपलब्ध होऊ शकेल आणि त्याठिकाणी कोणकोणत्या सुविधांची उपलब्धता करावयाची आहे, त्याचा प्रत्यक्ष आढावा घेऊन मगच त्यांनी शासनाला त्याविषयी अवगत केले. सर्व संबंधित ठिकाणी साफसफाईसह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठीचे काम युद्धपातळीवर करण्यासाठी आणखी सुमारे 500 कामगारांची व्यवस्थाही करण्यात आली. या सर्व संबंधित ठिकाणांहून काम सुरू होऊ शकेल, इतपत व्यवस्था करण्यात आली.
सर्वांचे लक्ष लागून होते, ते मंत्रालयाच्या कामाकडे! त्यामुळे शनिवारी आणि रविवारी तर मंत्री भुजबळ येथे ठाण मांडूनच बसून होते. रविवारी (दि. 24 जून) दुपारी तर त्यांनी मंत्रालयातील आपल्या दुसऱ्या मजल्यावरील दालनात बसून अधिकाऱ्यांची बैठकही घेतली आणि भोजनही घेतले. त्यानंतर पुन्हा साडेतीन तासांपेक्षा अधिक काळ संपूर्ण मंत्रालयात सुरू असलेल्या साफसफाई आणि अन्य कामाची व्यापक पाहणी केली. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर मा. मुख्यमंत्री महोदय आणि दुसऱ्या मजल्यावर मा. उप-मुख्यमंत्री महोदयांना बसण्यासाठी पर्यायी दालनांची व्यवस्था करण्याची सूचना भुजबळांनी केली होती. त्या दालनांची आणि त्यांना आवश्यक असलेल्या सुविधांची पूर्तता करण्याच्याही सूचना भुजबळांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
खाली उतरून आल्यानंतर मंत्रालयाच्या बाह्य दर्शनी भागाच्या रंगसफेदीच्या कामाकडेही त्यांनी बारकाईने लक्ष दिले. रविवारी सकाळी राष्ट्रध्वज मंत्रालयाच्या त्याच्या सर्वोच्च मूळ स्थानी फडकविण्यात यश आले होतेच; पण, सायंकाळी त्याच्याखाली असलेल्या राजमुद्रेलाही झळाळी प्राप्त करून देण्यात यश आले. रात्री उशीरापर्यंत रंगकाम पूर्ण होऊन मंत्रालयाचा दर्शनी भागही पूर्ववत झाला. मंत्रालयाचा सोनेरी फलकही पॉलिश करून चकाकदार बनविण्यात आला. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारी फुलांच्या कुंड्या बसवून दर्शनी भाग पूर्ववत सुशोभीकृत करण्यात आला. या सर्व कामांमध्ये श्री. भुजबळ स्वतः लक्ष घालून ती व्यवस्थित व्हावीत, यादृष्टीने प्रयत्नशील होते. रात्री साडेअकराच्या सुमारासही त्यांनी पुन्हा एकदा मंत्रालयाच्या परिसराला फेरफटका मारून काम गतीने आणि सुरळीत सुरू असल्याची खात्री करून घेतली आणि मगच ते मंत्रालयातून बाहेर पडले.
सोमवारी (दि. 25 जून) सकाळी नऊ वाजताच ते पुन्हा मंत्रालयात दाखल झाले. मा. मुख्यमंत्री महोदय पत्रकार परिषद घेणार असल्यानं तळमजल्यावरील मिनी थिएटर त्यासाठी सुसज्ज करण्यात आले आहे का, याची पाहणी त्यांनी केली. पत्रकार कक्षामध्येही जाऊन पत्रकारांना आवश्यक सुविधा तात्पुरत्या स्वरुपात का होईना, तातडीने उपलब्ध करण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.
तीन दिवस अखंडितपणे चाललेल्या भुजबळ यांच्या या प्रयत्नांचे आणि परिश्रमांचे, सोमवारी मंत्रालयाच्या आवारात झालेली श्रद्धांजली सभा, त्यानंतर मंत्रालयातच दुसऱ्या मजल्यावर पार पडलेली मंत्रिमंडळाची बैठक आणि मा. मुख्यमंत्री महोदयांची यशस्वीपणे पार पडलेली पत्रकार परिषद यामुळे सार्थक झाले आहे, असे म्हणता येईल.
पण, एवढ्यावरच ते समाधानी नाहीत. आता, संपूर्ण मंत्रालय तीन महिन्यांत पूर्वीप्रमाणेच करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. दररोज एखाद्या डॉक्टरप्रमाणे मंत्रालयात सुरू असलेल्या कामाच्या पाहणीसाठी मॉर्निंग, नून, इव्हनिंग आणि नाइट राऊंड सुरूच आहेत. सर्व संबंधित यंत्रणांचे सहकार्य लाभले तर, तीन महिन्यांत संपूर्ण मंत्रालयाचे कामकाज पूर्वपदावर आणण्याचा त्यांचा निश्चयही तडीला नेण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. तसा इतिहासच आहे!
- आलोक जत्राटकर

Wednesday, July 18, 2012

राजेश खन्ना यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार हरपला -छगन भुजबळ



मुंबई, दि. 18 जुलै : अभिनेते राजेश खन्ना यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका सुपरस्टारमय ‘स्टाइल’युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, 1960 आणि 1970च्या दशकात राजेश खन्ना यांनी भारतीय विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीवर एकहाती अधिराज्य गाजवले. अभिनयाची अनोखी शैली आणि विशिष्ट ‘राजेश खन्ना स्टाइल’ अदाकारीने त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. राजेश खन्ना यांचे चाहते, विशेषतः तरुणींमध्ये असलेली त्यांची कमालीची लोकप्रियता यांचे अनेक किस्से आणि आख्यायिका त्या काळातही चर्चिले गेले आणि आजही सांगितले जातात. चेतन आनंद यांच्या ‘आखरी खत’ या चित्रपटातून पदार्पण केलेल्या राजेश खन्ना यांनी त्यानंतर राझ, बहारों के सपने, औरत, इत्तेफाक, आनंद, आराधना, आप की कसम, रोटी, प्रेम कहानी, अंदाज, कटी पतंग, अमर प्रेम, नमक हराम, अजनबी, कुदरत, सौतन असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. किशोर कुमार यांचं पार्श्वगायन आणि पडद्यावर राजेश खन्ना हे समीकरण इतकं जुळून गेलं होतं की, त्यांना वेगळं करणं अशक्य होतं. या दोघांनी कित्येक सुपरहिट गाणी दिली; ती आजही चिरस्मरणीय आहेत. खासदार म्हणून त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रोमँटिझमचं युग आणणारा पहिला सुपरस्टार म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.